Published On : Mon, Jan 22nd, 2024

पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा;संपूर्ण जग झाले ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार !

Advertisement

अयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.

संपूर्ण देश या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले आहे.अयोध्यानगरीत भक्तांचा महासागर उसळला असून अवघा देश ‘राम’मय झाला आहे. महाराष्ट्रातही राम भक्तांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा केला. नागपुरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
 हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाद करण्यात आला. सनई चौघडे वाजवण्यात आले. पाच मंडपातून पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या गाभाऱ्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेची सुरुवात करण्यात केली. प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला. गणपती पूजन करून रामललाचे पूजन, प्राणप्रतिष्ठा, अभिषेक करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदी यांंनी चांदीचा एक मुकूट श्रीरामचरणी अर्पण केला. प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली . हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.