मुंबई : कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात, मराठी भाषा विभाग व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन, मराठी अभिमान गीत गाऊन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध गायक कौशल इनामदार आणि त्यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीताचे मान्यवरांसमवेत समूह गायन केले.
यावेळी विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, दोन्ही सभागृहांचे सदस्य, पुरस्कारप्राप्त मान्यवर साहित्यिक, पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधानभवन प्रांगंणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समूहगीत गायनानंतर विधिमंडळाच्या आवारात खास बोलावलेल्या, प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये प्रथम क्रमांक विजेत्या महाराष्ट्राच्या चित्ररथास सर्वांनी भेट दिली. दिवसभर हा चित्ररथ विधीमंडळ आवारात ठेवण्यात आला.