२२ वीज ग्राहकांकडून पाच लाखांचा भरणा
नागपूर : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या उपस्थितीत नागपूर शहरातील २२ ग्राहकांनी ४ लाख ९३ हजार रुपयांच्या वीज बिलांचा तात्काळ भरणा केला.
महावितरणच्या वतीने सर्वत्र थकबाकी वसुलीची मोहीम सुरु आहे. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी आज २२ फेब्रुवारीला नागपूर शहर मंडल अंतर्गत येणाऱ्या सुभेदार व मानेवाडा उपविभागातील थकबाकी वसुली मोहिमेचा विविध ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी ग्राहकांशी संवाद साधला.
त्यांच्या उपस्थितीत २२ ग्राहकांनी ४ लाख ९३ हजार रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला. यावेळी महावितरण आपणास अखंडित सेवा देत असताना आपणही नियमित वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले. तसेच महावितरण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करताना कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे वसुली मोहीम राबवावी असे आवाहन करून महावितरणचे व्यवस्थापन सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिली.
मोहिमेच्या दरम्यान सुमारे २ लाख ५१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असणाऱ्या ११ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या मोहिमेत नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे,कार्यकारी अभियंता समीर टेकाडे व इतर अभियंते,अधिकारी सहभागी झाले होते.