नागपूर :विदर्भात वनोपज, कोळसा यासारख्या साधन संपत्तीचा मुबलक प्रमाणात साठा असून या कच्च्या मालावर संशोधन करण्यासाठी नागपूरातील व्हिएनआयटी (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) तसेच एल. आय. टी. (लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था) यासारख्या संशोधन संस्थांचे सहाय्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले. व्हीएनआयटी च्या हीरक महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्हीएनआयटी चे संचालक डॉ.पडोळे, प्रशासकीय मंडळाचे संचालक डॉ. विश्राम जामदार, संस्थेचे माजी प्राचार्य डॉ.एम.बसोले उपस्थित होते.
देशात न्यूज प्रिंट, वैद्यकीय उपकरणे वूड पल्प अशा कच्च्या मालाची आयात होत आहे. सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालयातर्फे मध ,बांबू, लेनिन खादी अशा विविध कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. एव्हिएशन फ्युएल तयार करण्यासाठी गडचिरोलीतील वनसंपदा महत्त्वाची आहे.निरी सारख्या संस्था बांबूपासून तेल काढून त्यामार्फत सुद्धा असे एटीएफ इंधन तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. संशोधन संस्थांनी असा कच्चा माल उपलब्ध करणाऱ्या संबंधित संस्थांसोबत सहकार्य, समन्वय तसेच संवाद साधून योग्य तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. यामुळे मागास भागात उद्योग निर्मितीला चालना मिळेल , अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
व्हीएनआयटी लगत असणारी राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाची जागा केंद्रीय सूक्ष्म लघु मंत्रालयामार्फत संपादित करून ही जागा व्हीएनआयटी ला देण्यासाठी आपण गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु मंत्रालयाद्वारे या जागेवर ‘तंत्रज्ञान संशोधन व उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यासाठी आपण 200 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा करणार आहोत अशी घोषणा गडकरींनी केली.
व्हीएनआयटीमध्ये हिरक महोत्सवाप्रसंगी वर्षभर शैक्षणिक उपक्रम, कार्यशाळा, अतिथी व्याख्याने, संशोधन व विस्तार उपक्रम राबवले जाणार आहेत ,अशी माहिती संस्थेचे संचालक डॉक्टर पडोळे यांनी बोलताना दिली.
हिरक महोत्सवाच्या निमित्ताने मध्ये ‘सिमेंन्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ या केंद्राचे उद्घाटन सुद्धा गडकरींच्या हस्ते संपन्न झाले. या केंद्रामध्ये रोबोटिक्स, मशीन इंटेलिजन्स ,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यासारख्या ‘स्टेट ऑफ द आर्ट ‘प्रयोगशाळा असणार आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु व मंत्रालया अंतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सैलेन्स फोर इंनोवेशन’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी व्हीएनआयटी मध्ये स्थापन होणाऱ्या केंद्रास निधी मिळणार असल्याची माहिती डॉ. विश्राम जामदार यांनी दिली.
याप्रसंगी सर विश्वेश्वरय्या यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सुद्धा गडकरींच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास व्हीएनआयटी चे प्राध्यापक ,शिक्षक, विद्यार्थी, तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.