नागपूर/Nagpur: केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने नागपुरात ( Nagpur) स्थापन करण्यात आलेल्या भारतीय व्यवस्थापन संस्था-आय आयएमचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील ‘चिटणवीस सेंटर येथे आज झाले.
आयआसएम-नागपूरसाठी मार्गदर्शक-संस्था म्हणून कार्यरत असणा-या, आयआयएम-अहमदाबादचे संचालक डॉ. आशीष नंदा, नागपूरचे पालक मंत्री श्री. चंदशेखर बावनकुळे, राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. संजय चहांदे, आयआयएम अहमदाबादचे अधिष्ठाता डॉ. अजय पांडे, तसेच नागपूरचे विभागीय आयुक्त श्री. अनुपकुमार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
जगभरामध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था-भारतीय तंत्रज्ञान संस्थांचे विद्यार्थी असेलेले तज्ज्ञ, लक्षणीय योगदान करीत असतात आज नागपुरात ‘ आयआयएम’ – नागपूरचे ओपचारिक उद्घाटन होणे ही नागपूरसाठी-वैदर्भीयांसाठी-तसेच महाराष्ट्रातील जनतेसाठी स्वप्नपूर्ती आहे, असे भावपूर्ण उदगार मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेही काढले. राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांची उभारणी करणे, अत्यंत आव्हानात्मक असते, जेथे जेथे शैक्षणिक केंद्र (एज्युकेशन-हब) निर्माण होते, त्याच्या अवतीभवती विकासाची केंदेही विस्तारतात.नागपूरची याच दिशेने वाटचाल सुरू आहे, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या संदर्भात त्यांना मुंबई आणि पुणे या शहरांच्या यशकथांचा उल्लेख केला.
आपल्या देशात मोठया प्रमाणवर बुध्दिमान लोक असून, जगातील परिस्थिती आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे आश्वासक स्वरूप पाहता, जागतिक पातळीवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवणारा आणि नवे जागतिकदर्जाचे उत्पादक केंद्र म्हणून, भारत महत्वपूर्ण कामगिरी करू शकेल, अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अल्पावधीमध्ये आयआयएम-नागपूरच्या कार्यास प्रारंभ झाला याबद्ल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री श्रीमती स्मृती इराणी, नागपूरचे खासदार आणि केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग, रस्तेवाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री
श्री. नितीन गडकरी यांचे विशेषत्वाने आभार मानले .
नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहरात ‘आयआयएम’ सुरू होणे ही वैदर्भीय जनतेसाठी अत्यंत आनंदाची बाव असल्याचे सांगितले.
आयआयएम-अहमदाबादचे संचालक डॉ. आशीष नंदा यावेळी बोलतांना म्हणाले की ‘नागपूर-आयआयएम’ जागातिक स्तरावरची संस्था म्हणून विकसित व्हावी यासाठी मार्गदर्शक-संस्था म्हणून कार्यरत असणारी, आयआयएम-अहमदाबाद संपूर्णपणे वचनबध्द आहे. आयआयएम-नागपूरच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांना संबोधून बोलतांना ते पुढे म्हणाले, हा जादुई-प्रवास तुम्हाला माणूस म्हणून समृध्दीकडे घेऊन जाईल.
राज्यांच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. संजय चहांदे यांनी यावेळी सांगितले की नागपुरात ‘आयआयएम’सुरू व्हावी या संकल्पनेपासून तर आज त्याचे उद्घाटन होईपर्यत साधारण १० महिन्यांचा कालावधी लागला. देशात सर्वात कमी अवधीमध्ये नागपूरमध्ये ‘आयआयएम’ सुरू झाले असा उल्लेख, त्यांनी विशेषत्वाने केला.
विभागीय आयुक्त श्री. अनुमकुमार यांनी, ‘आयआयएम’ चा प्रारंभ हा नागपूरच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी नोंदवावा, असा दिवस असल्याचे सांगून प्रतिष्टित ‘आयआयएम-अहमदाबाद’च्या पदचिन्हांवर आयआयएम-नागपूरने वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजी-‘ ‘व्हीएनआयटी’ चे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ‘मिहान’ क्षेत्रातील दहेगाव येथे आयआयएम परिसराची उभारणी होईपर्यंत व्हीएनआयटी’ परिसरातून आयआयएम-नागपूरचे काम चालणार आहे.
जुलै-२०१४ मध्ये अर्थसंकल्पीय भाषण करताना वित्तमंत्री श्री. अरूण जेटली यांनी महाराष्ट्र, बिहार, हिमाचल प्रदेश, ओरिसा, तेलंगणा आणि पंजाब या राज्यांमध्ये सहा नव्या भारतीय व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येतील, असे सांगितले होते तर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २५ जून २०१५ ला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नागपूरसह अन्य पाच ठिकाणी भारतीय व्यवस्स्थापन संस्था स्थापन करण्यास मंजुरी दिली होती.