गोवा/नागपूर: गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वात गोव्याला भाजपाने स्थिर सरकार दिले. स्थिर सरकार ही गोव्याची ताकद आहे. आधी गोव्यात अस्थिर राजवट होती. गोव्याच्या इतिहासात स्थिर सरकारची गरज होती. काँग्रेसच्या राजवटीत वारंवार सरकार बदलत होते. परिणामी विकास खुंटला पण भाजपाचे सरकार सत्तेवर आले आणि गोव्याला स्थिर सरकार मिळाले, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भाजपाच्या केंद्रीय प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, आमदार व खासदार यावेळी उपस्थित होते.
गोव्याचा इतिहास विकासाचा आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- स्थिर सरकारचा फायदा काय तो गोव्याच्या जनतेसमोर आला. गोव्यातील प्रत्येक क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काम करून दाखविले. गोव्यात पोर्ट व्हावा यासाठी प्रयत्न झाले. नवीन एअरपोर्टसाठी प्रयत्न झाले. लवकरच विमानतळ पूर्ण होत आहे. यामुळे पर्यटन क्षेत्र दुपटीने वाढणार म्हणजे तरुणांच्या हाताला अधिक काम मिळेल.
मी मंत्री झाल्यानंतर गोव्यात 15 हजार कोटीची रस्त्यांची कामे केली आणि आता 22 हजार कोटी रुपयांची कामे गोव्यात सुरु आहेत. विकास कामे करताना अनेक संकटे, अडचणी आल्या. गोवा प्रगतीशील समृध्द राज्य आहे. टूरिझममध्ये गोव्यात विकासाचे अधिक क्षमता व संधी आहेत. गोव्याच्या प्रगतीसाठी वीज, पाणी, दळणवळणाची साधने व संवाद ही साधने आवश्यक आहे.
समर्पित भावनेने काम करणारा पर्रीकरसारखा कार्यकर्ता ही गोव्याची ताकद आहे. आता गोव्यात कामेच राहिली नाही. जेवढी मागणी आली तेवढी कामे पूर्ण झाली आहेत. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील शासनाने शिपिंग, पोर्ट मध्ये व गोव्याच्या विकासासाठी सातत्याने ही कामे केली. आणि चांगले चित्र निर्माण झाले. कारण गोव्यात स्थिर सरकार आहे. केंद्रात भाजपाचे आणि गोव्यातही भाजपाचे सरकार म्हणजे डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे ही सर्व कामे झाली, असेही गडकरी म्हणाले.
पर्रीकर यांनी ज्याप्रमाणे नि:स्पृह भावनेने काम केले त्याचप्रमाणे प्रमोद सावंत यांनीही तसेच काम केले. एका कर्तृत्ववान व कर्मठ कार्यकर्त्याची गोव्याला गरज होती. ती गरज प्रमोद सावंत यांनी पूर्ण केली. पर्रीकरांची उणीव त्यांनी भासू दिली नाही. पर्रीकर, सावंत यांचे नेतृत्व, नाईक यांचे दिल्लीतील काम, आमदार मंत्र्यांनी केेलेले काम व जनतेने दिलेले स्थिर सरकार यामुळे ही कामे झाली आणि गोव्याचा विकास होऊ शकला. गोव्याला आता ध्वनी, वायू व जलप्रदूषणापासून मुक़्त करून देशातील पहिले प्रदूषणमुक्त राज्य हे गोवा असेल. प्रदूषणात आंतरराष्ट्रीय मापदंडापर्यंत गोव्याला पोहोचवणार, असेही ना. गडकरी म्हणाले.