नागपूर: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांतील शिक्षकांना डिजीटल प्रशिक्षण देण्यासाठी राहतेकरवाडी येथील साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात चवथ्या टप्प्यातील डिजीटल प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी (ता. २६) नगरसेविका नेहा वाघमारे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी डिजीटल प्रशिक्षणाचे समन्वयक मन्साराम डहाके, विषयतज्ज्ञ मिलिंद खेकाळे उपस्थित होते. मनपाच्या ३४ शाळा आतापर्यंत डिजीटल झाल्या आहेत. मागील वर्षी १८ शाळा डिजीटल करण्यात आला. या डिजीटल शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी माध्यमिक शाळांतील १६० शिक्षकांना सहा टप्प्यात प्रशिक्षित करण्याचा उपक्रम मनपाने हाती घेतला आहे. आतापर्यंत प्रशिक्षणाचे तीन टप्पे आटोपले असून चौथ्या टप्प्यात २६ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार असून यात २८ शिक्षक-शिक्षिका सहभागी झाल्या असल्याची माहिती समन्वयक मन्साराम डहाके यांनी दिली.
विषयतज्ज्ञ मिलिंद खेकाळे यांनी यावेळी प्रात्यक्षिकाद्वारे डिजीटल प्रशिक्षणाची माहिती दिली. तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून आणि डिजीटल बोर्डवरील पडदा काढून आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.