नागपूर : ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमी वर येणाऱ्या लाखो दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपातर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता: 11) लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी मनपाच्या सोयी सुविधांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन केले.
नियंत्रण कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, घन कचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख उपायुक्त डॉ.गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, अशोक घरोटे, उपद्रव शोध पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांना मनपातर्फे योग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना आनंददायी अनुभव यावा व सर्व सोयीसुविधा मिळाव्यात याकरिता मनपा कटिबद्ध असल्याचे सांगत आयुक्त डॉ. चौधरी यांनी दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करुन नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये याबाबत विशेष काळजी घ्यावी, नागरिकांच्या तक्रारी आणि सूचनांकडे लक्ष द्यावे, आदी सूचना ही आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी दिल्या. याशिवाय अधिकारी व कर्मचारी यांनी योग्यरीत्या नियोजन केल्याबद्दल आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांचे अभिनंदन केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या संख्या लक्षात घेता ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दीक्षाभूमीवर येणाऱ्या मार्गांवर चार ठिकाणी मनपाचे आरोग्य तपासणी केंद्र, २४ तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मदतीसाठी साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ नियंत्रण कक्ष, अग्निशमन पथक, शौचालयांची व्यवस्था, निवारा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, परिवहन व्यवस्था, अग्निशमन पथक आदी सर्व सुविधा मनपाद्वारे दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी करण्यात आलेल्या आहे.
मनपाचे रक्तदान केंद्र
दीक्षाभूमीवर येणाऱ्या सर्व बौद्ध अनुयायांना सुविधा प्रदान करण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातर्फे दीक्षाभूमी परिसरात रक्तदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य व्यवस्था संदर्भात उपसंचालक आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांचेशी समन्वय साधून अनुषंगीक कार्यवाही करण्यात आली आहे. एखादी आकस्मिक घटना घडल्यास आपदाग्रस्तांना तातडीने औषधोपचार मिळावा, यासाठी डॉक्टरसह परिचारिका कर्मचारी ॲम्बुलन्स उपयुक्त साधंनासह सतत २४ तास उपचार केंद्र सुरु राहणार आहे. याशिवाय रहाटे कॉलोनी चौक, नीरी रोड, काचीपूरा चौक, बजाज नगर चौक ते लक्ष्मीनगर चौक येथे औषधोपचार व तात्पुरते दवाखानेची व्यवस्था करण्यात आली आहे.