मनपाची ६ केंद्रे व ४० महिला बचत गटांमार्फत ध्वजविक्री
चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा ’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उंचावीणे अपेक्षित आहे. मनपा संलग्न कार्यालये व महीला बचत गट मार्फत नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले आहे. याअंतर्गत आज मनपा मुख्य कार्यालय येथे राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे, डॉ.अमोल शेळके,उपअभियंता रवि हजारे उपस्थित होते. नागरीकांना ध्वज कमी किमतीत व सहजतेने उपलब्ध व्हावा यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे नियोजन करण्यात आले असुन मनपाची मुख्य इमारत, ३ झोन कार्यालये, आझाद गार्डन चौक येथील बेघर निवारा केंद्र, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ज्युबिली हायस्कूल अश्या ६ केंद्रांवर ध्वजविक्री सुरु करण्यात आली असुन मनपाच्या सहकार्याने ४० महीला बचत गटांमार्फत सुद्धा ध्वज विक्री केली जात आहे. ध्वजसोबतच राष्ट्रध्वजाचा वापर व सन्मान कसा करावा यासंबंधी ध्वजसंहिता असलेले परिपत्रक सुद्धा दिले जात आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा हर घर तिरंगा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी आपला देश स्वतंत्र होण्यास 75 वर्ष पुर्ण होत आहेत म्हणुन हा 75 वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
याप्रसंगी विकास दानव,रफीक शेख,प्रदीप पाटील, चिंतेश्वर मेश्राम,मयुर मलिक, चॅनल वाकडे, प्रवीण गुळघाणे, शंकर निमजे, विनोद खांडरे व कर्मचारी उपस्थित होते.