व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीच्या ‘न्यू ग्लोबर इनोव्हेशन पार्कचे उद्घाटन
नागपूर: नवीन उद्योग सुरु करण्यासाठी देशातील मोठ्या महानगरांचीच निवड केली जात आहे. त्यामुळे मोठ्या महानगरांमध्ये आता खूप गर्दी झाली आहे. नवीन उद्योग आता आर्थिक व सामाजिक दृष्टया मागास असलेल्या लहान शहरांमध्ये सुरु करून उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले.
व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांनी व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीच्या ‘न्यू ग्लोबर इनोव्हेशन पार्कचे उद्घाटन केले. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरची देशात मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. उच्च तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आपल्या देशात उपलब्ध असताना या क्षेत्राची आयात कमी होऊन निर्यात वाढली पाहिजे. परकीय गुंतवणूक आल्याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले तर रोजगार निर्मिती होईल व आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या भागाचा विकास होईल. हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे.
इलेक्टॉनिक हार्डवेअर ऑफ इंडियाने लोकांची गरज लक्षात घेऊन आपली उत्पादने तयार करावी. उच्च तंत्रज्ञानाचा व कौशल्याचा वापर करून ही उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची, नवीन आकर्षक डिझाईनची तयार झाली, तर त्याची निर्यात शक्य होईल. आज आपल्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत.
ही आव्हाने कमी करण्यासाठी निर्यातीची गरज आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, याकडेही ना. गडकरींनी यावेळी लक्ष वेधले.