रामटेक: परिसरातील नागरिकांच्या विद्युतविषयीच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पवनी येथे ३५ गावासाठी स्वतंत्र विद्युत वितरण केंद्रास मंजुरी देण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोलाचे योगदान आहे.त्याच केंद्राचे आज शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताचे दरम्यान क्षेत्राचे आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते पवनी येथील नवीन विद्युत वितरण केंद्राचे शीलान्यास करून थाटात उदघाटन करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनीचे अधीक्षक अभियंता नागपूर ग्रामीण मंडळ नारायण आमझरे कार्यकारी अभियंता अमित परांजपे ,उपकार्यकारी अभियंता आशिष तेजे , देवलापार चे अप्पर तहसीलदार आडे, गटविकास अधिकारी बी .डब्लू.यावले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ग्राहकांच्या हिताची बाब लक्षात घेऊन ग्राहकांच्या तक्रारीचा आता त्वरित निपटारा होईल त्यामुळे मुसळधार पाउस सुरु असतांना देखील सरपंच संघटणेचे तालुका अध्यक्ष सरपंच गणेश चौधरी ,सरपंच सुधीर नाखले,सरपंच नितेश सोनवाने,सरपंच उमेश भांडारकर ,विजय कोकोटे , श्रावण बोरकर ,सरदार शेख. चंद्रशेखर माकडे आदी मान्यवर यांनी उपस्थिती दर्शविली .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता नारायण अमझरे यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की ,”पवनी येथील स्वतंत्र विद्युत वितरण केंद्राचे कार्यालय सुरू झाल्याने पवनी परिसरातील ३५ गावातील ग्राहकांच्या विद्युत संबंधी समस्या निकाली काढण्यास सोयीचे होईल. तसेच या कार्यालयासाठी नवीन कनिष्ठ अभियंता पद लवकरच भरण्यात येईल “असेही त्यांनी सांगितले. तसेच हे विद्युत वितरण केंद्र सुरू झाल्यामुळे ३५ गावातील विज ग्राहकांचे कामकाज याच कार्यालयामार्फत कामकाज होणार आहे.
देवलापार व पवनी हा परिसर जंगलांनी वेढलेला असून आदिवासीबहुल आहे. याआधी देवलापार येथेच वीज वितरण केंद्र असल्यामुळे परिसरातील ७१ गावांचा गावे या कार्यालयांतर्गत होती. त्यामुळे कुठेही विद्युतमध्ये बिघाड झाला तर दोन दोन दिवस विजेअभावी नागरिकांना रात्र काढावी लागत होती .परंतु आता पवनी वीज वितरण केंद्र अंतर्गत ३५ गावे व देवलापार वीज वितरण केंद्र अंतर्गत ३६ गावांचा सहभाग राहणार आहे.
देवलापार नजीकच्या वडांबा येथे ३३/११ केव्हीच्या उपकेंद्रास ऊर्जा विभागाची मंजुरी प्राप्त झाली असून येत्या काही दिवसात लवकरच हे उपकेंद्र सुरू होणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनीचे सहाय्यक अभियंता प्रणव कावळे ,नितीन महाडिक ,हेमंत देशमुख यांनी प्रयत्न केले .