विविध दुर्मिळ अंकांनी वेधले लक्ष
नागपूर : राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ आंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले.
विधिमंडळ परिसरातील या उद्घाटन कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, संचालक सुरेश वांदिले, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी, विशेष कार्य अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी यवतमाळ राजेश येसनकर, वरिष्ठ सहायक संचालक डॉ.सं.शि. खराट, सहाय्यक संचालक शैलजा वाघ-दांदळे, व अन्य अधिकारी उपस्थित होते.
विधीमंडळ परिसरात प्रवेश करताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उभारण्यात आलेले लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन येणाऱ्या- जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने हा उपक्रम राबविला आहे. या प्रदर्शनात 1964 पासूनचे अनेक विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बालगंधर्व विशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर 1990), सानेगुरुजी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, महात्मा गांधी, स्वातंत्र्य दिन, विदर्भ विशेषांक (2011 व 2017) अखिल भारतीय साहित्य संम्मेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह इतरही विषयाला परिपूर्ण वाहिलेले विशेषांकही उपलब्ध आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महामानव’ ही पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहेत.
सुरुवातीच्या काळात लोकराज्य अंक हे कृष्णधवल (ब्लॅक ॲण्ड व्हाईट) मुद्रीत केलेले असायचे. 2006 पासून लोकराज्य मासिक रंगीत स्वरुपात मुद्रीत करुन वाचकांच्या हातात पडू लागले आहे. कालानुरुप ‘लोकराज्य’मध्ये बदल होत आला आहे. सुरुवातीला केवळ शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयोगात येणारे हे मासिक इतरही एक-एक विषयाला वाहण्यात आले. मांडणी, आशय आणि सजावट यामध्येही हळूहळू बदल झाला. इंग्रजी, ऊर्दु, गुजराती आणि हिन्दी या भाषांमधूनही लोकराज्य प्रकाशित होत असून ते सर्व अंक ऑनलाईनही उपलब्ध असतात.
दुर्मिळ अंक
1964-पंडित जवाहरलाल नेहरु, 1971, 72, 73, 75, 79, 1980- ऑगस्ट स्वातंत्र्यदिन विशेषांक, 2001- डॉ. पंजाबराव देशमुख विशेषांक, 1997- ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, 1987- बालगंधर्व, 1999- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी विशेषांक, 1991- सुधाकरराव नाईक, 1996- सावित्रीबाई फुले विशेषांक, 2012- यशवंतराव चव्हाण विशेषांक- यशवंत कीर्तीवंत, दुर्मिळ अंक वि. दा. सावरकर, राजर्षी शाहू महाराज, 1972- मराठवाडा विकास विशेषांक, रविद्रनाथ टागोर विशेषांक, आरोग्य संपदा विशेषांक, अहिल्याबाई होळकर, विदर्भ विशेषांक आदीसह अनेक दुर्मिळ विशेषांक या प्रदर्शनात पहावयास उपलब्ध आहेत.