नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महिलांच्या कौशल्य विकासातून आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या समाज विभागा अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून संचालित सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्र सीताबर्डी येथे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते रविवारी २ मार्च रोजी स्टिचिंग क्लस्टर डेव्हलपमेंट केंद्राचे उद्घाटन झाले.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या सहकार्यातून हे स्टिचिंग क्लस्टर डेव्हलपमेंट केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्रामध्ये आरोह मल्टिपर्पज सोसायटीद्वारे महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, डब्ल्यूसीएल चे श्री शेखर रियापोलू, सीएसआर व्यवस्थापक आर. रश्मी, आरोह संस्थेचे अध्यक्ष विशाखा राव, मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांसाठी स्टिचिंग क्लस्टर प्रकल्प नागपूर महानगपालिका, आरोह मल्टीपर्पज सोसायटी आणि डब्लू.सी.एल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश बचत गटातील महिलांना प्रकल्पात समावून घेणे व त्यांना रोजगार प्राप्तीच्या दृष्टिकोनातून गणवेश तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. या प्रकल्पामध्ये आतापर्यंत ३० गरजू महिलांनी प्रवेश घेतला आहे. येणाऱ्या तीन वर्षात १०० महिलांना गणवेश तयार करण्यासाठी टेलरिंग प्रशिक्षण देऊन एक स्टिचिंग क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे. टेलरिंग प्रशिक्षणासोबत या महिलांमध्ये नेतृत्व विकास घडवून यावा याकरिता विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी मनपा, आरोह संस्था आणि डब्ल्यूसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या स्टिचिंग क्लस्टर प्रकल्पाची प्रशंसा केली. महिलांना युनिफॉर्म मेकिंग प्रशिक्षणाच्या माध्यमातून उदरनिर्वाहची साधने उपलब्ध होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरोह संस्थेने महिलांच्या प्रशिक्षणाकरिता एक चांगला पुढाकार घेतला असल्याचे नमूद केले. त्यामुळे महिलांनी मेहनत आणि समर्पण भावाने प्रशिक्षण पूर्ण करावे, असेही ते म्हणाले. मनपातर्फे अर्थसंकल्पात अनेक योजनांसाठी आर्थिक तरतूद केली जाते. त्यामुळे चांगल्या योजना आल्यास त्याला महानगरपालिका अधिक मदत करेल, अशी ग्वाही डॉ. चौधरी यांनी दिली.
डब्ल्यूसीएल चे श्री शेखर रियापोलू यांनीही डब्ल्यूसीएलने सीएसआर निधी देऊन आरोह संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले. चांगले क्लस्टर तयार झाले असून महिलांना त्यांचा फायदा अधिक होईल असेही ते म्हणाले.
यावेळी समाज विकास विभागातील विनय त्रिकोलवार, शहर व्यवस्थापक नूतन मोरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोहच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी यांनी तर संचालन ममता गजभिये यांनी केले. आभार शारदा भुसारी यांनी मानले.