महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे आदेश
नागपूर: अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी प्रतीक्षा यादीत ४५ वर्षे वय ओलांडलेल्या आईच्या नावाच्या ठिकाणी मुलीचे नाव समाविष्ट करून नियमानुसार नोकरी देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
हरिराम रामकृष्ण हेडाऊ हे तिरोडा तहसील कार्यालयात कार्यरत असताना ११ जुलै २००८ ला त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे २००८ मध्येच त्यांची पत्नी जयवंती हेडाऊ यांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचे नाव अनुकंपा यादीत समाविष्ट करण्यात आले. दरम्यान २०१६ मध्ये त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून त्यांची मुलगी माधुरी हेडाऊ यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची विनंती केली.
परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी जयवंती हेडाऊ यांना ४५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना किंवा त्यांच्या मुलीला नोकरी देण्याचा अर्ज फेटाळला. त्यामुळे माधुरी हेडाऊ यांनी मॅटमध्ये धाव घेतली. माधुरी यांच्यावतीने ॲड. नाझीया पठाण आणि ॲड. मंगेश राऊत यांनी काम पाहिले. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्या. गिरटकर यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर पत्नीऐवजी मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे आदेश गोंदिया जिल्हाधिकारी व राज्य सरकारला दिले.