नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्याएम.ए. अभ्यासक्रमात भाजपच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यावर विरोधकांनी यावर संताप व्यक्त केला. कारण विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकातील काँग्रेसच्या इतिहासाला कात्री लागली आहे. तर कम्युनिस्ट पक्षाला इतिहासातून वगळण्यातच आले आहे.यावर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
रामजन्मभूमीच्या आंदोलनाचा अभ्यासक्रमात समावेश –
इतिहासाच्या अभ्यासक्रमात १९८० ते २००० या दरम्यानच्या आंदोलनांत जनआंदोलन म्हणून आता रामजन्मभूमीचे आंदोलन शिकवले जाणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या सराव मंडळाने या समावेशांना मंजुरी दिली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल-
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या नावावर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने इतिहासाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. भाजपचा समावेश करण्यासाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती १९४८ ते २०१० अशी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील ‘राष्ट्रीय राजकीय पक्ष’ या प्रकरणात काँग्रेसचा इतिहास कमी करण्यात आला आहे. त्याऐवजी आता जनसंघाची स्थापना, भाजपची स्थापना, त्यांचे कार्य, विस्तार, विचारधारा, त्यांची राष्ट्रीय भूमिका आदींची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात येणार आहे.