नागपूर : धर्माच्या नावावर जगभरात जे काही अत्याचार होत आहेत, ते धर्माबाबतच्या गैरसमजामुळे घडले आहे. त्यामुळे संप्रदायांनी योग्य पद्धतीने धर्म समजावून सांगायला हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. अमरावतीच्या महानुभाव पंथाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी जगातील सर्व अत्याचार हे धर्माच्या चुकीच्या आकलनामुळे झाले असल्याचे म्हटले आहे.
धर्माला नीट समजून घेतल्यास समाजात शांतता, सौहार्द आणि समृद्धी येऊ शकते. धर्माचा खरा उद्देश मानवतेची सेवा करणे आणि मार्गदर्शन करणे हा आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा अत्याचारांना प्रोत्साहन देणे नाही. धर्माच्या मूलभूत तत्त्वांवर भर देताना ते म्हणाले की, धर्माचे अचूक ज्ञान आणि पालन केल्याने समाजाची उन्नती होते आणि सर्वांचे कल्याण होते, असेही भागवत म्हणाले.
सृष्टीच्या प्रारंभापासून धर्म आहे, म्हणूनच त्याला सनातन म्हणतात. जो धर्माला मानतो, त्याचे कल्याण होते. धर्म हा सत्याचा आकार असल्याने त्याचे रक्षण झाले पाहिजे.
धर्माचे आचरणकर्तेच त्याचे रक्षणकर्ते आहेत. धर्माचे आचरण समजले पाहिजे आणि समजल्यावर मनात ठेऊन चालणार नाही, तर ते आचरणात आणून धर्माला अपेक्षित कृती झाली पाहिजे. धर्म समजावा लागतो तो समजवणे कठीण असले तरी तो समजवता येतो, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.