नागपूर: राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरुवारी कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून कोरटकर यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात सांगितले होते की ते कोरटकर यांचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जातील.’छावा’ चित्रपटावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आपली भूमिका मांडली होती. तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी त्यांना फोन करून थेट धमकी दिली आणि त्यांच्यावर ब्राह्मण समाजाचा द्वेष करण्याचा आरोप केला. सावंत यांनी या संदर्भात फोनवरून झालेले संभाषण फेसबुकवर पोस्ट केले आहे. ‘मुख्यमंत्र्यांचा खास माणूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत कोरटकर यांनी सावंत यांना असभ्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांच्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.यानंतर मोठा वाद पेटल्याचे पाहायला मिळाले.
कोरटकर याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिस दलाचे पोलिस उपनिरीक्षक संतोष गालवे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक नागपूरला पोहोचले. तथापि, काही पोलिसांच्या मदतीने तो कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपला असल्याची चर्चा होती. अखेर कोल्हापूर पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दुसऱ्याच दिवशी, कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली.
तिसऱ्या दिवशी, त्याची पत्नी पल्लवी फरार कोरटकरचा मोबाईल फोन आणि सिम कार्ड घेऊन सायबर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. या सर्व घडामोडींमागे कोरटकर यांना गृहमंत्रालयाचा आशीर्वाद आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूर न्यायालयाने कोरटकर यांना ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तथापि, कोल्हापूर पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत उच्च न्यायालयात त्यांचा जामीन रद्द करावा यासाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी मागितली होती.
गुरुवारी दुपारी कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. आरोपी प्रशांत कोरटकर यांचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी सरकारी वकिलामार्फत परवानगी मागण्यात आली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयात हा अर्ज दाखल करण्यात आला.