राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर सोसायटीची वार्षिक बैठक
नागपूर : कर्क रुग्णांच्या उपचारासाठी राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली असून मध्य भारतातून मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी भरती होतात. अशा सर्व रुग्णांना सहज उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कॅन्सर रिलिफ सोसायटीची राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरची वार्षिक सर्वसाधारण सभा पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांच्य प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, संस्थेचे उपाध्यक्ष बसंतलाल शॉ, संचालक डॉ. सुब्रोजित दासगुप्ता, सचिव अशोक क्रिपलानी, सह सचिव डॉ. लालकृष्ण छांगानी, कोषाध्यक्ष आवतराम चावला, रणधीर जवेरी आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल हे मध्य भारतातील गरीब व गरजवंत रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देतात. कॅन्सरसारख्या आजाराने पीडित असलेल्या सामान्य रुग्णांना येथे चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत. कॅन्सरच्या आजाराबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या संस्थेच्या विकासासाठी तसेच उपचाराचा दर्जा वाढविण्यासाठी विविध प्रकल्प सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अधिक व चांगल्या सुविधा जनतेला उपलब्ध होतील, असेही यावेळी सुनील केदार यांनी सांगितले.
संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपक्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कर्क रुग्णांना सवलतीच्या दरात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देताना इतर सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
प्रारंभी संस्थेचे संचालक डॉ. सुब्रोजित दासगुप्ता यांनी संस्थेचे विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.