नागपूर: जुन्या कार्यकर्त्यांच्या त्याग, बलिदानामुळेच आज आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना या संकटातूनही आपण बाहेर पडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा देश सुपर इकॉनॉमिक पॉवर होईल असा संकल्प करू या, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
एका संदेशाद्वारे त्यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- केवळ सत्ता परिवर्तनासाठी भाजपची स्थापना झाली नाही, तर समाज आणि राज्य बदलण्याची मनीषा घेऊन स्थापना झाली. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, अटलजी, अडवाणीजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सुरू आहे. काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्यात आले आहे, मूळ भारतीयांना निवासाचा हक्क मिळावा म्हणून नागरी कायदा पास झाला आहे. प्रगती आणी विकासाकडे देशाची वाटचाल सुरू आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आज देश कोरोनाशी संघर्ष करीत आहे. यावरही आम्ही मात करू. सोशल डिस्टनसिंग करून आजच्या स्थितीत ज्यांची खाण्याची व्यवस्था नाही अशा गरिबांची कार्यकर्त्यांनी सेवा करावी. आपण जनतेसोबत उभे राहावे. लोकसेवा, लोकशिक्षण, लोकसंघर्ष या त्रिसूत्रीवर भाजप उभा आहे. सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने जे मागासले आहेत अशा लोकांसोबत उभे राहणे, त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. कोरोनाच्या संकटावर आपण निश्चित मात करू असा विश्वास व्यक्त करून नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.