Published On : Mon, Sep 10th, 2018

भारत बंद; नागपूरत संमिश्र प्रतिसादाला सुरुवात

नागपूर : राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दृष्य आहे. उपराजधानीत बंदला फारसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. येथे परंपरेनुसार मारबतची मिरवणूक निघाली असून काही बाजारपेठांमध्ये गर्दी आहे तर शहराच्या काही भागात बंद पाळला जातो आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे बाजारपेठ सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली आहे. कार्यकर्ते मुख्य चौकात येऊन निदर्शने व घोषणा करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना येथेही कडकडीत बंद पाळला जातो आहे. गडचिरोली जिल्ह्यात आष्टी येथे सकाळपासून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर अहेरीत मात्र बंदचा कुठेच प्रभाव दिसून आला नाही.

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी, शेतकरी कामगार पक्षानेदेखील समर्थन दिले आहे. देशातील नागरिक दरवाढीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे या बंदचे समर्थन करीत असल्याची भूमिका या पक्षांनी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसतर्फे सकाळी १० वाजता देवडिया काँग्रेस भवन येथून निदर्शनांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.

देशात पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. दरवाढीची झळ मध्यमवर्गीय, चाकरमानी, शेतकरी अशा सर्वांनाच पोहचली असताना सरकार मात्र याची कुठेही दखल का घेताना दिसत नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. शहरात बंददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या बंदला इतरही विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. हा बंद यशस्वी करण्याच्या रणनीतीबाबत काँग्रेसने रणनीती आखली असून चौकाचौकामध्ये निदर्शने करण्यात येणार आहे.काँग्रेसने पुकारलेल्या या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील समर्थन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांची भूमिका काय?
महाल, इतवारी, सक्करदरा या परिसरातील दुकाने दुपारपर्यंत बंद राहणार आहेत. दुपारनंतर व्यापारी आपली प्रतिष्ठाने उघडणार आहेत. मात्र शहरातील इतर भागांमध्ये नेमकी काय स्थिती राहणार, हे व्यापारी संघटनांनी स्पष्ट केलेले नाही.

शांतिपूर्वक निदर्शनेच करणार
दरम्यान, भारत बंददरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये याची काळजी विरोधी पक्षांकडूनदेखील घेण्यात येणार आहे. बंदसाठी १८ ‘ब्लॉक’मध्ये पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके लोकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे आंदोलन पूर्णत: अहिंसात्मक असेल, असे विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले. बंदच्या तयारीसाठी शहर काँग्रेसतर्फे रविवारी ‘ब्लॉक’स्तरावर बैठकादेखील घेण्यात आल्या.

आज आॅटो बंद
राफेल व पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढविरुद्ध काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला विविध राजकीय पक्ष व संघटनांनीही समर्थन जाहीर करीत, या बंदमध्ये प्रत्यक्ष सहभगी होण्याचा निर्णय घेतला आहे. आॅटो संघटनेनेही बंदला समर्थन जाहीर करीत आॅटोसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या बंदला समर्थन करीत सोमवारी रस्त्यांवर आॅटो न चालवण्याचा निर्णय आॅटो संघटनांनी घेतला आहे.

संपूर्ण विदर्भात तब्बल ८० हजार आॅटो सोमवारी रस्त्यांवर धावणार नाहीत, असा दावा आॅटो संघटनांनी केला आहे. विदर्भ आॅटो चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी सांगितले की, आॅटो संघटनेतर्फे सोमवारी भारत बंदमध्ये सहभागी होऊन संविधान चौकात निदर्शने केली जातील.

यासोबतच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (बॅरि. खोब्रागडे) यांच्यातर्फे यशवंत तेलंग आणि प्रा. विजय बारसे यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध भारत बंदला समर्थन दिले आहे. पक्षातर्फे १० सप्टेंबर रोजी संविधान चौक येथून दरवाढीविरुद्ध स्वाक्षरी अभियानास सुरुवात केली जाईल. यासोबतच भीम शांती सेनेचे प्रेमदास चहांदे, नीलेश वाघमारे, महाविदर्भ जनमोर्चातर्फे गौतम माटे, योगेश ठाकरे यांनीही भारत बंदला समर्थन जाहीर केले आहे.

Advertisement