नागपूर : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी २ ऑक्टोबरला, बुधवारी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयासह संपूर्ण दहाही झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’ अभियान राबविण्यात येणार आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेमध्ये मनपा मुख्यालयासह सर्व झोन परिसरात झोनच्या सहायक आयुक्तांच्या उपस्थितीत ‘इंडिया प्लॉग रन’ अभियान राबविले जाईल.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशामध्ये ‘इंडिया प्लॉग रन’ अभियान राबविण्यात येणार आहे. देशातील ५२ शहरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये नागपूर शहराचा समावेश आहे, हे विशेष.
नागपूर महानगरपालिकेद्वारे ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्लास्टिक निर्मूलनासाठी झोन कार्यालय, शाळा, महाविद्यालये, दुकाने, बाजार आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली. या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून उद्या बुधवारी (दि.२ ऑक्टोबर) ‘इंडिया प्लॉग रन’द्वारे नागरिकांच्या सहभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलनाचा जागर करण्यात येणार आहे. ‘प्लॉग रन’मध्ये शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीनी प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. याशिवाय शहरातील स्केटिंग व दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडूही या अभियानामध्ये सहभागी होउन प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती करतील.
‘प्लॉग रन’ दरम्यान मनपा मुख्यालय व झोन परिसरात प्लास्टिक निर्मूलनासाठी आयोजित कार्यक्रमस्थळी मनपाच्या प्लास्टिक संकलन करणा-या गाड्या उपलब्ध राहणार आहेत. परिसरात प्लास्टिक निर्मूलनाबाबत जनजागृती केली जाईल प्लास्टिक संकलीत करण्यात येईल. झोनस्तरावरील संकलन केंद्रावर हे प्लास्टिक संकलीत करुन ते प्रक्रियेसाठी पाठविण्यात येईल.
आपले नागपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘प्लॉग रन’मध्ये सहभागी व्हावे व यापुढे ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर न करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
*‘प्लॉग रन’चे वेळापत्रक*
सकाळी ६.३० ते ७ वाजता – प्लास्टिक गोळा करणे, किट वितरण
सकाळी ७ ते ७.२० वाजता – ‘डिटॉक्स युवर माईंड ॲण्ड बॉडी‘ या संकल्पनेवर योगा आणि ध्यान सत्र
सकाळी ७.२० ते ७.३० वाजता – यावेळेत वेळेवर येणारी आवश्यक माहिती दिली जाईल
सकाळी ७.३० ते ९ वाजता – ‘डिटॉक्स अवर नेबरहुड’ या संकल्पनेवर प्लागिंग सत्र
सकाळी ९ ते ९.३० वाजता – कच-याची विल्हेवाट लावणे, प्लास्टिक निर्मूलनाची प्रतिज्ञा
*‘प्लॉग रन’ची झोन स्तरावरील ठिकाणे*
लक्ष्मी नगर – धंतोली उद्यान, सावरकर नगर चौक
धरमपेठ – अंबाझरी उद्यान, वर्मा लेआउट
हनुमान नगर – दुर्गा नगर स्कूल, जवाहन नगर परिसर
धंतोली – सुभाष रोड उद्यान
नेहरूनगर – दत्तात्रय नगर उद्यान
गांधीबाग – गांधीबाग उद्यान मार्केट
सतरंजीपुरा – शांतीनगर उद्यान, शांतीनगर परिसर
लकडगंज – आंबेडकर उद्यान, आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू
आसी नगर – वैशाली नगर उद्यान
मंगळवारी – मंगळवारी बाजार, जरीपटका मार्केट