नवी दिल्ली – देशात येत्या काळात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारताने 2027 पर्यंत 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घातली पाहिजे आणि इलेक्ट्रिक आणि गॅस-इंधन असलेल्या वाहनांवर स्विच केले पाहिजे,अशी शिफारस ऑईल मंत्रालयाने तयार केलेल्या अहवालात करण्यात आली आहे.
सचिव तरुण कपूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालात 2035 पर्यंत अंतर्गत ज्वलन इंजिन असलेल्या मोटारसायकल, स्कूटर आणि तीनचाकी वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे सुचवले आहे. मात्र, अद्याप सरकारने हा अहवाल स्वीकारलेला नाही.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारी समितीने शिफारस केल्याची माहिती आहे. फारशींमध्ये 2027 पर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच 2024 पासून शहरी भागात डिझेलवर चालणाऱ्या सिटी बसेसची नोंदणी बंद करण्याचेही सांगण्यात आले आहे.
या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास, पुढील 10 वर्षांत,10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये 75 टक्के इलेक्ट्रिक वाहन चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे.