आयआयएम नागपूरच्या नवीन कायमस्वरूपी आणि विस्तारित कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नागपूर: भारतीय व्यवस्थापन संस्था, आयआयएम नागपूर येथील वातावरण आणि परिसंस्था विद्यार्थ्यांमध्ये नोकरी शोधणा-या ऐवजी नोकरी-निर्माते बनण्याची मानसिकता वाढवेल ,असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नागपूर येथे केले. नागपूरच्या वर्धा रोडवरील मिहान क्षेत्रात स्थित आयआयएम येथील नवीन कायमस्वरूपी आणि विस्तारित कॅम्पसचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान, राज्याचे उद्योग मंत्री मंत्री सुभाष देसाई, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, आयआयएम नागपूरचे अध्यक्ष सी.पी. गुरुणानी , संचालक डॉ. भीमराया मैत्री, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपतींनी याप्रसंगी आयआयएम नागपूरने ‘फाऊंडेशन फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट-इनफेड’ या संस्थेसह 7 उत्कृष्टतेच्या केंद्रच्या स्थापनेच्या पुढाकाराचे कौतुक केले. आयआयएम नागपूरने या संस्थाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना महिला स्टार्टअप कार्यक्रमातून पदवी प्राप्त करण्यास यशस्वीरित्या सक्षम केले आणि त्यांच्यासाठी सहा उपक्रम सुरू केले, अशी माहिती त्यांनी दिली.
आयआयएम नागपूरच्या ‘प्रादेशिक नवोपक्रम संघटकाच्या’ असलेल्या भूमिकेचे कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाले की , ही संस्था नाविन्यपूर्ण सेवा आणि उद्योजकता प्रदान करण्यासाठी ‘व्यवसाय इनक्यूबेटर’ म्हणून काम करेल आणि अंतत: ‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी या क्षेत्रातील उद्योगांना मदत करेल.
महाराष्ट्राची भूमी ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडीच केंद्र आहे आणि नागपूर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीतील ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनासाठी निवडलेले ठिकाण आहे. आयआयएम या नागपूरच्या भूमीत होणे यातच धन्यता आहे, असे मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केले.
आयआयएम कॅम्पसच्या भेटीदरम्यान, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी राष्ट्रपतींना कॅम्पसच्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली. राष्ट्रपतींनी संस्थेच्या फलकाचे अनावरण करून नवीन विस्तारित कॅम्पसचे उद्घाटन केले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूरला शैक्षणिक, वैद्यकीय आणि लॉजिस्टिक हब बनवण्याचे स्वप्न आम्ही साकार करत आहोत. नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यासाठी आयआयएमने मदत करावी. विदर्भात खनिज संपत्ती, वन आणि वन्यजीव, पर्यटन यांसारख्या विपुल संधी उपलब्ध आहेत. आयआयएमने विदर्भातील उद्योगांशी समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचविले.
आयआयएम नागपूर ‘नोकरी शोधणाऱ्यां’ऐवजी ‘नोकरी निर्माण करणाऱ्यांमध्ये’ पुढाकार घेईल. अशी अपेक्षा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. विदर्भातील कोणतीही वंचित किंवा अविकसित शाळा किंवा शैक्षणिक संस्थान दत्तक घेण्यासाठी आयआयएम नागपूरने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि आयआयएमचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या मदतीने क्षमता वाढीच्या उपक्रमांद्वारे अशा संस्थांचा कायापालट करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्रधान यांनी केले.
आयआयएम नागपूर केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञच निर्माण करणार नाही तर उद्योजकता आणि उद्योग क्षेत्रातही नेतृत्व करेल. आयआयएम नागपूर हे नेतृत्व समोर आणेल असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयआयएम नागपूरला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा निश्चय केला असल्याचही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयएम नागपूरच्या कॅम्पसची पायाभरणी करण्यात आली. संस्थेने विक्रमी वेळेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा पूर्ण केल्या आहेत. आयआयएम सोबतच एम्स, राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थान यासारख्या संस्था देखील नागपूर शहरात स्थापन केल्या आहेत, ज्यामुळे नागपूर शैक्षणिक केंद्र बनले आहे, असे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
लोक आयआयएम नागपूरला भेट देऊन नागपूरचे भविष्य पाहण्यासाठी येतील. भविष्यातील जागतिक नेते घडवण्याचा वारसा या संस्थेकडे असेल अशी भावना आयआयएम नागपूरच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सी पी गुरनानी यांनी व्यक्त केली. आयआयएम नागपूरला मिहान येथील जागेत जाण्यापूर्वी व्ही.एन.आय. टी. ने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभारही मानले.
नागपूर शहरातील वर्धा रोडवरील मिहान परिसरात 132 एकर जागेवर आयआयएम नागपूरचा कॅम्पस उभारण्यात आला आहे. त्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आणि ऑगस्ट 2015 मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून संपूर्ण आयआयएम कॅम्पस त्याच परिसरात एम्स हॉस्पिटलला लागून आहे.
सध्या, आयआयएम नागपूर 668 विद्यार्थ्यांना ऑन-कॅम्पस पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आणि विविध ऑनलाइन प्रमाणपत्र कार्यक्रमांसह व्यवस्थापन शिक्षण देत आहे. कॅम्पसमध्ये 20 हाय-टेक क्लासरूम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे तसेच 400 आसन क्षमता असलेले एक सभागृह देखील समाविष्ट आहे.
या कार्यक्रमाला आयआयएमचे विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी, विविध उद्योग संघटनाचे प्रतिनीधी उपस्थित होते.