नागपूर : देशात घरघुती एलपीजी गॅसचा पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल कॉपोरेशन लिमिटेडने आजपासून एलपीजी सुरक्षा अभियानाला नागपुरातून सुरुवात केली. केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरु असलेल्या उज्वला गॅस योजनेमुळे घराघरात घरघुती गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे महिलांना घरघुती गॅसच्या वापरासंबंधी आणि सुरक्षा संबंधी माहिती देता यावी, यासाठी या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
या अभियानाबाबत माहिती देतांना कंपनीचे महाराष्ट्र कार्यकारी निदेशक मुरली श्रीनिवासन यांनी सांगितले की, या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांना वितरण कर्मचाऱ्यांकडून गॅस सिलेंडर स्वीकारण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे होय.
या अभियानाच्या माध्यमातून सिलेंण्डर घरपोच देणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्हॉल्व आणि सदोष ‘ओ रिंग’ मधून होणाऱ्या गॅस गळतीची माहिती गॅसचा वापर करणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे. यासाठी गॅस डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘प्री डिलिव्हरी चेक किट’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना गॅसचे निर्धारित वजन बघता यावे यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन मशीनही देण्यात येत आहे.
यावेळी विदर्भातील ग्राहक आणि त्यांना कश्याप्रकारे गॅसचा पुरवठा केला जातो याची माहिती देतांना श्रीनिवासन म्हणाले की, विदर्भात दररोज साडे सात लाख गॅस सिलेंडर पुरविले जाते.
यात दीडशेपेक्षा जास्त वितरक, ७१५ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील धनज येथे एलपीजी बॉटलिंग प्लांट असून, लवकरच नागपुरातही आश्याचप्रकारचा प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.