नवी दिल्ली :भारताचा दिग्गज गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रविचंद्रन अश्विनने याची घोषणा केली.
पाचव्या दिवशी जेव्हा सामना थांबला तेव्हा टीम इंडियाचे सदस्य ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होते, यादरम्यान रविचंद्रन अश्विनने विराट कोहलीला मिठी मारली, यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की अश्विन लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल. यानंतर अश्विनने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशीही चर्चा केली. काही वेळातच त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन निवृत्तीची घोषणा केली.
तामिळनाडूच्या रविचंद्रन अश्विनने नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो कायम कसोटी संघात होता. अश्विनने 106 कसोटी सामन्यांमध्ये 24.00 च्या सरासरीने 537 विकेट घेतल्या आहेत.
या काळात अश्विनने 37 वेळा एका डावात पाच विकेट घेतल्या. त्याने सामन्यात 8 वेळा 10 विकेट घेतल्या. 38 वर्षीय रविचंद्रन अश्विन भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. तसेच त्याने मुरलीधरनच्या बरोबरीने सर्वाधिक (11 वेळा) प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारही त्याने जिंकले आहेत.