मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस असून जागतिक गुंतवणूकदारांचे सर्वात पसंतीचे राज्य आहे. देशातील सर्वाधिक स्टार्टअप ची गुंतवणूक राज्यात झाल्यामुळे महाराष्ट्र हे स्टार्टअपची राजधानी म्हणून ओळखली जाते आहे. महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (आयएफसीआयआय) च्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बांद्रा कुर्ला संकुलातील हॉटेल सोफीटेल येथे आयोजित या सभेत फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर जिग्लर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेंबरचे अध्यक्ष गिल्लाउम गिरार्ड-रेयडेट, महासचिव पायल कंवर आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, इंडो फ्रान्स चेंबर ऑफ कॉमर्स ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या बरोबर राज्यात उद्योगाच्या वाढीसाठी सुयोग्य वातावरण तयार करण्यासाठी सहकार्य करण्यास राज्य शासन तयार आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नतील 50 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. तर देशाच्या औद्योगिक उत्पादनात 25 टक्के एकट्या महाराष्ट्राचे आहे. गेल्या चार वर्षांत उद्योग वाढीसाठी इज ऑफ डुइंग बिझनेस, डिजिटल प्लॅटफॉर्म, एक खिडकी योजना आदी विविध उपाययोजनांमुळे राज्य हे जागतिक गुंतवणूकदारांचे सर्वाधिक पसंतीचे राज्य बनले आहे. गेल्या वर्षात राज्यात 40 टक्क्यांपेक्षा जास्त थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या परिवर्तनाच्या प्रवासातही महाराष्ट्राचा मोलाचा सहभाग आहे. राज्यातील मुबलक व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, कुशल तंत्रज्ञान यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात राज्याकडे आकर्षित होत आहेत. अनेक फ्रेंच कंपन्यांनी राज्य शासनाच्या नागपुरातील स्मार्ट सिटी, पुण्यातील घनकचरा व्यवस्थापन, मुंबईतील मेट्रो आदी प्रकल्पात सहभागी आहेत, याचा आनंद वाटतो असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीने दोन्ही देश आणखी जवळ आले असून या देशातील व्यापारी संबंध वाढण्यास मदत झाली आहे. याचा फायदा महाराष्ट्राला सुद्धा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. जिग्लर यांनी महाराष्ट्र व मुंबई हे उद्योग व व्यापाराचे मोठे केंद्र असल्याचे सांगून महाराष्ट्राबरोबरच भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक फ्रेंच कंपन्या येथे येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.