नागपूर :देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर ४ जूनला लागणार आहेत. याच्याआधीच महागाईचा भडका पाहायला मिळत असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. अमूल कंपनीच्या दुधाच्या दरात प्रतिलीटरमागे 2 रूपयांनी भाव वाढ करण्याचा निर्णय नुकताच जाहीर झाला. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे महामार्गावरील प्रवासही आता महाग झाला आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशभरातील टोल टॅक्समध्ये वाढ केली आहे. त्यामुयळे आता वाहनचालकांना सोमवारपासून अनेक टोल प्लाझांवर 3 ते 5 टक्के जास्त टोल टॅक्स द्यावा लागणार आहे.
देशात वाढत्या उष्णतेमुळे दूध उत्पादक अडचणीत सापडला आहे. अनेक ठिकाणी चाऱ्या-पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर झाला आहे. अशा परिस्थितीत अमूलने लिटर दूध दरात वाढ केल्याने इतर दूध उत्पादक कंपन्याही दुधाच्या दरात वाढ करू शकतात.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, हे नवे दर सोमवार 3 जून 2024 अर्थात आजापासूनच लागू होणार आहेत. सोमवारपासून देशभरातील सुमारे 1,100 टोल प्लाझांवरील टोल दरात 3 ते 5 टक्के वाढ होणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुचनेनुसार, टोलनाक्याच्या २० किलोमीटरच्या परिघातघात राहाणाऱ्या लोकांचे मासिक पासचे दरही वाढले आहेत. रस्ते प्रकल्पांच्या विकासासाठी हे महत्वाचे असल्याचा दावा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे करण्यात येतो. मात्र यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत असल्याचे सांगत विरोधक सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.