महापौर-आयुक्तांनी संयुक्तरीत्या दिली कोरोना नियंत्रण कक्षाला भेट
नागपूर : सध्या कोरोनाचे रुग्ण नागपूर शहरात वेगाने वाढत आहे. मेडिकल, मेयो व अन्य शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय रुग्णालयातील खाटांसह शहरातील सर्व खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची माहिती कोरोना नियंत्रण कक्षातून देण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संयुक्तरीत्या मंगळवारी (ता. २३) मनपा मुख्यालयातील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर येथील कोरोना नियंत्रण कक्षाला भेट देत संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी नियंत्रण कक्षातून होणाऱ्या कार्याची संपूर्ण माहिती घेतली. कोरोनासंदर्भातील रुग्णालयांची कुठलीही माहिती हवी असेल तर ती नागरिकांना दिली जाते. शहरातील कुठल्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत यासह पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनाही फोनद्वारे विचारपूस करण्यात येते. त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यात येते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
महापौर म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ही भीती घालविण्यासाठी नियंत्रण कक्ष हा त्यांचा आधार ठरायला हवा. नागरिकांच्या मनात कुठलीही शंका असो, त्याचे निरसन कोरोना नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून व्हायला हवे. आता या कोरोना नियंत्रण कक्षातून विधानसभा क्षेत्रनिहाय आणि झोननिहाय विचारणा करुन त्यानुसार जवळच्या कोव्हिड रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती देता येईल. तसेच रिक्त खाटांची अद्ययावत माहिती कोरोना केंद्रातून देण्यात यावी, अशी सूचना महापौर श्री. दयाशंकर तिवारी व आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी केली आहे.
उपरोक्त नियंत्रण कक्षाव्दारे रुग्णवाहिका, औषधोपचार, आवश्यकता पडल्यास शववाहिका व अन्य माहितीसाठी संपर्क साधता येईल.