– राजे रघुजी नगर भवन ( टाऊन हॉल ) येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न
नागपूर : मागील महिन्यात जाहीर झालेल्या शालांत परीक्षा आणि त्यापूर्वी बारावी वर्गाच्या बोर्ड परीक्षेच्या निकालांमध्ये मनपाच्या शाळांनी यशस्वी कामगिरीची नोंद केली. यशाचा हा आलेख चढता राहावा याकरिता प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता यांत वाढ होणे क्रमप्राप्त आहे. त्याच हेतूने महानगरपालिका प्रशासन, आकांक्षा फाऊंडेशन आणि लीडरशीप फॉर इक्विटी ( एल. एफ. ई. ) यांच्या संयुक्त विद्यमाने माझी शाळा, सक्षम शाळा या उपक्रमाची औपचारिक सुरुवात दि. २६ जुलै २०२२ रोजी करण्यात आली. याप्रसंगी नागपूर शहरातील मनपाच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन राजे रघुजी नगर भवन ( टाऊन हॉल ) येथे करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती. प्रीती मिश्रीकोटकर, डेल फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती. समर बजाज, आकांक्षा फाउंडेशनतर्फे श्रीमती. जयश्री ओबेरॉय, एल. एफ. ई. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. दामिनी मैनकर आणि सहसंचालक श्री. मयुरेश भोवते आणि डॉ. वसुधा वैद्य आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. शिक्षणाधिकारी श्रीमती. प्रीती मिश्रीकोटकर यांनी केले. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण मनपाच्या शाळांतून देण्याचा मनोदय आणि त्यासाठी आयोजित कार्यशाळेची पार्श्वभूमी त्यांनी उपस्थितांना विशद केली. माझी शाळा, सक्षम शाळा या उपक्रमाची गरज आणि उद्देश देखील त्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांसमोर यावेळी मांडला.
त्यानंतर इतर मान्यवरांनी देखील या उपक्रमासंबंधी आपली मते मांडली. आकांक्षा फाऊंडेशन आणि एल. एफ. ई. या संस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी आपापल्या संस्थांची सुरुवात, कार्य, उद्देश आणि प्रवास याबद्दल थोडक्यात माहिती दिली. राज्याच्या इतर महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेले गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे हे कार्य नागपूर मनपा क्षेत्रात देखील यशस्वी होईल यासाठी आपण सामूहिकरित्या प्रयत्न करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.
यानंतर पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून आकांक्षा फाऊंडेशन आणि एल. एफ. ई. संस्थांच्या प्रतिनिधींनी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण (इंग्रजी) यासाठी करावयाचे कार्य, त्याचे घटक आदी विषयांवर प्रकाश टाकला. तसेच या उपक्रमाअंतर्गत गुणवत्ता शिक्षण, इंग्रजी शिक्षण, दर महिन्याला बैठका आणि त्याकरिता टप्प्याटप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. उपस्थित मुख्यध्यापक आणि शिक्षकांशी मुक्त संवाद साधत त्यांची मते देखील जाणून घेण्यात आली आंणि वातावरण हलकेफुलके करीत त्यांना बोलते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मनपा शाळेतील सहायक शिक्षिका डॉ. वसुधा वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन मनपाचे सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके यांनी केले. कार्यशाळेला मनपाच्या विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शिक्षण विभाग समन्वयक विनय बगले व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.