नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मात्र दुसरीकडे याच मुद्द्यावरून ओबीसी समाजानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये मतभेद निर्माण झाले आहे. हा प्रश्न राज्य सरकार उत्तम प्रकारे हाताळत असून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही संकल्पबद्ध आहोत, सोबतच राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले.
‘रूग्णालय आपल्या दारी’ या योजनेबद्दलही देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. नागपुरात खणिकर्मचा निधी उपलब्ध आहे, त्यातून ‘रूग्णालय आपल्या दारी’ ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. यामाध्यमातून गोरगरीब जनतेला आरोग्यव्यस्था दारी मिळेल,असे फडणवीस म्हणाले.
आरक्षणावर विविध समाज एकमेकांसमोर उभा राहणे ही परिस्थिती योग्य नाही, राज्य सरकार व स्वतः मुख्यमंत्री या महत्वाच्या प्रश्नावर गंभीर असून लवकरचं सर्व समाजाच्या फायद्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदें घेतील, तो पर्यंत राज्यात शांतता कायम ठेवा,असे आवाहनही फडणवीस यांनी केले.