– किशोर कन्हेरे यांची शासनाला पत्राद्वारे मागणी
नागपुर: महाराष्ट्रासह देशभरामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींवर अन्याय होत आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षणाची तरतूद असताना यंदाच्या वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेत केवळ ३.८ टक्केच आरक्षण देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे सांगत हा अन्याय दूर करण्याची मागणी शिवसेना प्रवक्ते आणि ओबीसी नेते किशोर कन्हेरे यांनी केलेली आहे.
कन्हेरे यांनी यासंबंधात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींवरचा हा अन्याय दूर करण्याची मागणी केलेली आहे.
देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी ६६ हजार ३३३पैकी १५ टक्के म्हणजे ९ हजार ९५० जागा केंद्रीय कोट्यात आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वाट्याला २७ टक्के आरक्षणानुसार २ हजार ५७८ जागा येणे अपेक्षित होते. परंतु केवळ ३७१ जागा म्हणजे ३.८ टक्के आरक्षण मिळाले आहे. याउलट अनुसूचित जातीतील उमेदवारांना १ हजार ३८५ (१५ टक्के) आणि अनुसूचित जमातीला ६६९ (७.५ टक्के) एवढ्या नियमानुसार जागा मिळाल्या. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तब्बल ७ हजार १२५ जागा देण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांत वैद्यकीय समितीकडून हे सातत्याने होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
केंद्रीय शैक्षणिक संस्था, केंद्रीय महाविद्यालय आणि केंद्रीय विद्यापीठात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण देण्यात येत असल्याचे केंद्राने स्पष्ट केलेले असल्यानंतरही वैद्यकीय महाविद्यालयांत अनुसूचित जाती आणि जमातीप्रमाणे ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळत नसून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांवर यामुळे मोठा अन्याय होत आहे.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींवर होत असलेला हा अन्याय दूर करून ओबीसी बांधवाना न्याय मिळवून देण्याची विनंती शिवसेना प्रवक्ते आणि ओबीसी नेते किशोर कन्हेरे यांनी शासनाला केलेली आहे.