नागपूर: बाजारात जाताना भाजीची पिशवी घरीच विसरली तर आता प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करू नका. नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने “नयी सुविधा” या स्वयंसेवी संस्थेतर्फे शहरातील बाजारांमध्ये स्वयंचलित कापडी पिशवी मशीन लावण्यात येत आहे. मनपाच्या सीताबर्डी येथील सुपर मार्केटमध्ये संस्थेतर्फे पहिली मशीन लावण्यात आली असून मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी या मशीनच्या कार्यप्रणालीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त विजय हुमने, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे आदींची उपस्थिती होती. बर्डी बाजारपेठेत येणा-या नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करावा आणि जर त्यांच्याकडे पिशवी नसेल तर या सुविधेचा लाभ घ्या, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
प्लास्टिक निर्मुलनाचा भाग म्हणुन मनपाने बर्डी सुपर बाजारात कापडी पिशवी मिळण्याकरीता पहिली मशीन लावण्यात आलेली आहे. “नयी सुविधा” संस्थेचे अतुल पानट यांनी यावेळी मशीनची माहिती दिली. सीताबर्डी येथील मनपा सुपर मार्केटमध्ये लावलेल्या मशीनची १०० पिशवीची क्षमता आहे. १० रुपये नाणे किंवा नोट या मशीनमध्ये टाकल्यानंतर एक कापडी पिशवी मशीनमधून बाहेर येते. या पिशवीची क्षमता १० किलो आहे. विशेष म्हणजे मशीनमध्ये अद्ययावत सेंसर यंत्रणा असून याद्वारे पाच रुपयांचे दोन नाणे अशा स्वरूपात दहा रूपये टाकल्यानंतर पिशवी बाहेर येते. याशिवाय १० रुपयांपेक्षा मोठ्या रक्कमेची नोट टाकल्यास तेवढ्या पिशव्या बाहेर येतात. मशीनमध्ये पिशव्या नसल्यास किंवा पुरेशे नाणे न टाकल्यास टाकलेले पैसे परत येतात. याशिवाय मशीनमध्ये पिशव्यांच्या उरलेल्या संख्येबाबत मशीनच्या डिस्प्लेवर याची माहिती येते.
नागपूर महानगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी अभियानाचा एक भाग म्हणून नयी सुविधा संस्थेने पुढाकार घेतला आहे. कापडी पिशवी मशीनच्या माध्यमातून नागपूरकरांना प्लास्टिक पिशवीला पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मशीनचे तंत्रज्ञान बाहेरचे असले तरी यात बदल करून नागपूरमध्येच ही मशीन तयार केली असून पुढे इतर बाजारातही अशा मशीन लावण्यात येणार असल्याचे संस्थेचे अतुल पानट यांनी सांगितले.