नागपूर : श्री गणेश विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, जलप्रदूषण टाळले जावे यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची आणि निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी मनपा आयुक्त अभिजीत बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केली.
सक्करदरा तलाव येथील पाहणीदरम्यान उपमहापौर दीपराज पार्डीकर, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, आमदार सुधाकर कोहळे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त स्नेहा करपे, नगरसेविका रिता मुळे, स्नेहल बिहारे, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे सक्करदरा तलाव मूर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे. विसर्जनासाठी तलावासमोर २० बाय ४० आकाराचे तीन खड्डे खणण्यात आले असून विसर्जनासाठी विहीरीचे पाणी टाकण्यात आले आहे. ३८ कृत्रिम टँक तलाव परिसरात लावण्यात आले असून कमी उंचीचे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन त्या ठिकाणी करता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संपूर्ण नागपूर शहरात सुमारे ३०० कृत्रिम टँक घरगुती गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सक्करदरा तलाव परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कठडे लावण्यात आले असून वेळोवेळी सूचना देण्यासाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. नियंत्रणासाठी तीन स्टेज तयार करण्यात आले असून निर्माल्य एकत्रित करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी कलश ठेवण्यात आले आहेत. गणपती नोंदणी कक्ष, प्रमाणपत्र वाटप केंद्रही तयार करण्यात आले आहे. याठिकाणी क्लिन ॲण्ड ग्रीन फाऊंडेशन, सुर्योदय कॉलेज, अद्वेत फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मदतीकरिता सेवा देतील, अशी माहितीही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
यानंतर नाईक तलाव आणि गांधीसागर येथील व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. मनपा आयुक्त अभिजीत बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आरोग्य सभापती दीपराज पार्डीकर यांनी तयारीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिलेत.
मनपातर्फे आवाहन
गणेश विसर्जन नागपुरात शांततेत व्हावे, यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागपूर शहर हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने फुटाळा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी गणेश विसर्जनासाठी बंदी घातली आहे. ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा. कृत्रिम तलावातच मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर नंदा जिचकार, आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.