नागपूर: सर्वोच्च न्यायालयाने महाल भागातील केयीबाग मार्गाच्या रुंदीकरणाला हिरवी झेंडी दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया मंगळवार (ता. २४) पासून सुरू झाली. या संपूर्ण रस्त्याची पाहणी मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी आज केली.
यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेवक राजेश घोडपागे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील होते.
मनपा झोन कार्यालयालगत असलेली मनपाच्याच मालकीची एक इमारत पाडून रस्ता रुंदीकरण मार्गातील अडथळे दूर करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. यानंतर आयुक्तांनी संपूर्ण केळीबाग रस्त्याची पाहणी केली. अतिक्रमण विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी घेतली. यावेळी माजी महापौर व प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दटके यांनी त्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण व इतर सर्व इमारतीसंदर्भात माहिती दिली.
अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, एसएनडीएल, ओसीडब्ल्यू व तत्सम विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रुंदीकरण होत असलेल्या केळीबाग मार्गाच्या सीमेंटीकरणाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आयुक्तांच्या या दौऱ्यात परिसरातील व्यापारी व नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काही व्यापारी व नागरिकांशीही चर्चा केली.