नागपूर : राज्य परिवहन विभागाच्या वतीने वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याचे निर्देश दिले आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबर प्लेट नाहीत. त्यामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
‘एचएसआरपी’ नंबर प्लेट्स विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असून, त्यावर परावर्तित रंग आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. या प्लेट्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज ओळखल्या जाऊ शकतात, ज्यामुळे वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यास मदत होते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर ग्रामीण) विजय चव्हाण यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात सुमारे १४ लाख ६३ हजार वाहनांना नंबर प्लेट बसवाव्या लागतील. यापैकी सुमारे ५ हजारांच्या घरात वाहनांनाच लावण्यात आले आहेत. १२ हजारच्या घरात वाहनाने प्रतीक्षेत आहेत. इतर वाहनचालकांनीही नोंदणी करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.