बुलढाणा : काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान सोमवारी या घटनेतील मृतांना शांती मिळावी म्हणून समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या ठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करून, मृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला.
आता या प्रकरणी बुलढाण्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास मृतांच्या आत्म्याला शांती मिळेल, असा दावा करत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक संस्था दिंडोरीच्या वतीनं शेकडो जणांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली. तसेच मृत्युंजय मंत्राचा जप देखील करण्यात आला. मात्र हे सर्व प्रकरण अंधश्रद्धेला खतपाणी देणारे असल्याने याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.