नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लावत 3 महिलांसह 7 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 25 किलो गांजासह 5,63,000 रुपयांचा मालही जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पकडलेल्या आरोपींमध्ये जसबीर सिंग, महेशकुमार सोबरवाल, अनुपम सिंग, भरत मिठू, शबाना उर्फ मोना मकसूद लोधी, बबिता अशोक ठाकूर आणि नेहा विजय सिंग यांचा समावेश आहे. तर हा माल पुरविणाऱ्या आरोपी नाव पंडितजी उर्फ लड्डू हा फरार असून तो छत्तीसगड येथील रहिवाशी आहे. त्याचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
रविवारी दुपारी गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. दरम्यान, एका सामानाच्या ट्रॉलीवर 3 पोती घेऊन आरोपींचा एक गट स्टेशनच्या बाहेर आला.
पोलिसांनी संशयितांना स्थानकाबाहेर ऑटो स्टँडजवळ थांबवले. पोलिसांनी सामानाच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या 3 गोण्यांची झडती घेतली. झडतीदरम्यान तिन्ही पोत्यांमध्ये गांजा जप्त करण्यात आला. पोत्यांमध्ये भरलेला 25 किलो गांजा, 6 मोबाईल फोन आणि सामानाची ट्रॉली असा एकूण 5.63 लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे.
हा गांजा पंडित जी उर्फ लड्डू नावाच्या आरोपीने पुरवला होता, त्याचाही पोलिस शोध घेत आहेत. गुन्हे शाखेने आरोपीला पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.