Nagpur: भारताचे पंतप्रधान श्री. नरेद्र मोदी यांनी आपल्या प्राचीन योगवि़दयेला केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे आज जगातील अनेक देशांमध्ये योग दिवस उत्साहाने साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृती इतिहास आणि वारसा याचा जो गौरव आज सा-या जगात होत आहे, ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपूर महानगर पालिका आणि जर्नादन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
योगविदयेच्या प्रसारासाठी ज्या योगी-संन्यासी-महर्षींनी आपले आयुष्य वेचले त्या सर्वांना श्री. गडकरी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात अभिवादन केले. जर्नादन स्वामी योगाभ्यासी मंडळाने योगप्रसारासाठी जे कार्य केले त्याचा त्यांनी या वेळी आर्वजून गौरवपूर्ण उल्लेख केला तसेच अन्य सामाजिक सस्थांनीही या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
आधुनिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या आरोग्यविषयक अनेक समस्यांवर योगविदयेव्दारे तोडगा काढला जाऊ शकतो. योगाचा जीवनप्रणाली म्हणून अंगिकार केला तर माणसाला निरामय अवस्थेपर्यंत विकास करता येऊ शकतो. असे विचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेद्र फडणवीस यांनी यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना व्यक्त केले.
नागपूर महानगर पालिका आणि जर्नादन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागपूर, जिल्हा योग संगटना, बृहन् महाराष्ट्र योगपरिषद, अमरावती, दक्षिण मध्य सास्कृतिक केंद्र, नागपूर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते. ‘आनंदयोग’ या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
जर्नादन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह आणि ज्येष्ठ योगगुरू श्री. रामभाऊ खांडवे यांचा केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले, महापौर श्री. प्रवीण दटके, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, अनेक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त श्री. अनुपकुमार, यांच्यासह अधिकारीगण व अन्य मान्यवर उपस्थित होते.