नागपूर : अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन २२ जानेवारीला करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १ ते १५ जानेवारीदरम्यान विदर्भातील १५ लाखांहून अधिक घरांमध्ये निमंत्रणाच्या अक्षता वाटण्यात येणार असल्याची माहिती विहिंपचे क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली.ते पत्रकार परिषदेत बोलत होते .
५ नोव्हेंबरला देशभरातील २०० कार्यकर्त्याना श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजीत अक्षता व प्रभू श्रीरामाचे छायाचित्र व माहिती पत्रक दिले जाणार आहे. या अक्षता आणण्यासाठी महाराष्ट्रातून १० तर विदर्भातून दोन कार्यकर्ते जाणार आहेत. २७ नोव्हेंबरला नागपुरात या अक्षता आल्यावर पोद्दारेश्वर मंदिरात पूजा होईल त्यानंतर विदर्भातील लाखो घरामंध्ये अक्षताचे वाटप होणार आहे.
अयोध्येतील मंदिराच्या लोकार्पणाला सर्वाना जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ‘माझा परिसर माझे अयोध्या, माझे गाव माझे अयोध्या’ अंतर्गत राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत सकाळी ११ वाजेपर्यंत गावागावात ध्वज उभारण्यात येणार असल्याची माहिती गोविंद शेंडे यांनी दिली.