नागपूर: इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल ग्रुप (आयपीएल) नावाची खाजगी संस्था ‘मिशन २०२० या अभियानाअंतर्गत’ तरुणाईमधून राजकारणात सहभागासाठी उत्तम नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते तयार करण्यासाठी संपूर्ण भारतात आपल्या कार्यशाळा आणि शिबीर आयोजित करीत आहे. त्यांचे आगामी शिबीर १० एप्रिल रोजी चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूका पाहता त्यादृष्टीने लोकांची माहिती गोळा करणे आणि त्यांच्याशी संपर्काची तयारी करवून घेण्यासाठी काही छुपा अजेंडा तर राबवला अजात नाही ना, याची पडताळणी आणि या संस्थेचा नेमका उद्देश आणि कार्यशैली जाणून घेण्यासाठी नागपूर टुडेने ‘आयपीएल’ सोबत संपर्क साधला. परंतु पहिल्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर त्वरित संपर्क झाला. तेव्हा ‘आयपीएल’च्या प्रतिनिधीने सांगितले की, ही संस्था खाजगी असून देशभरात आपली शिबिरे आयोजित करते. सध्या त्यांचे शिबीर अहमदाबाद येथे सुरु आहे. या शिबिरांमध्ये भाग घेण्यासाठी प्रथमतः आयपीएल च्या संकेतस्थळावर नोंदणी करून आपली संपूर्ण माहिती असलेला अर्ज भरावा लागतो. त्यानंतर एक ऑनलाईन मानसोपचार चाचणी घेतली जाते. मग शिबिरस्थळी प्रत्यक्ष मुलाखत झाल्यानंतरच प्रशिक्षणासाठी उमेदवाराची निवड केली जाते. ऑनलाईन नोंदणी विनाशुल्क असून प्रशिक्षणासाठी आकारले जाणारे शुल्क हे प्रत्यक्ष शिबिरस्थळीच उमेदवाराला सांगितले जाईल अशी माहिती आयपीएलच्या प्रतिनिधीने दिली.
परंतु आयपीएलचे संकेतस्थळ तपासले असता कळले की, या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे शुल्क तब्बल २.५ लाख रुपये आहे. परंतु थेट उमेदवारांकडून मात्र केवळ २५००० रुपयेच आकारले जातील. उमेदवारांना त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील १००० लोकांशी संपर्क साधण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल, जेणेकरून ते उमेदवाराच्या प्रशिक्षणाचा उर्वरित खर्च उचलतील.
तसेच संबंधित उमेदवाराचा खर्च उचलणाऱ्या लोकांना त्याच्यासोबत जोडण्यासाठी त्यांना सुद्धा इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिकल लिडरशीप जीवनात बदल घडविणारे प्रशिक्षण दिले जाईल असा दावा संस्थेच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे.
—Swapnil Bhogekar