Published On : Thu, Jan 4th, 2018

आयआरबीचे संस्थापक दत्तात्रेय म्हैसकर यांचे निधन

Advertisement

डोंबिवली : ‘आयडियल रोड बिल्डर’चे संस्थापक दत्तात्रेय म्हैसकर (वय ८०) यांचे डोंबिवलीत राहत्या घरी बुधवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास निधन झाले. गेल्या पाच महिन्यांपासून ते श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. बुधवारी दुपारपासून अचानक त्यांचा आजार बळावला व सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, वीरेंद्र व जयेंद्र ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा डोंबिवलीतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतात उच्च दर्जाचे रस्ते बनवणे, हे त्यांचे प्रमुख योगदान होते. युती सरकारच्या काळातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे ची निर्मिती ही त्यांच्या कंपनीने केली. हीच त्यांची प्रमुख ओळख आहे. त्या वेळी म्हैसकर यांनी राज्य सरकारला ९५० कोटी रुपयांचा धनादेश समारंभपूर्वक दिला होता. एका मराठी उद्योजकाने एवढी मोठी रक्कम राज्य सरकारला दिल्याचे कौतुक झाले होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर नुकसानग्रस्तांना मदतनिधी म्हणून १०० कोटी रुपयांचा धनादेश देणारे व्यावसायिक अशीही त्यांची ख्याती होती. डोंबिवली जिमखाना वास्तूचे नूतनीकरण आणि शहरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, यासाठी म्हैसकर स्पोर्ट्स क्लबची संकल्पना त्यांचीच होती. महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश यांसह असंख्य राज्यांमध्ये रस्ते बनवण्याचे प्रमुख कार्य त्यांची कंपनी अद्यापही करत आहे.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी म्हैसकर यांनी त्यांच्या पत्नी सुधा म्हैसकर यांच्या नावे फाऊंडेशन सुरू केले. डोंबिवलीसह राज्यातील विविध सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य देत नवतरुणांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. डोंबिवली शहर इतिहास संकलनामध्ये म्हैसकर यांच्या कारकिर्दीचा प्रवास विशेषत्वाने नमूद करण्यात आला आहे. आयआरबीचा वाढता पसारा लक्षात घेता त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून कार्यालय व निवास पवई येथे हलवला.

मात्र, डोंबिवलीशी असलेली नाळ त्यांनी कधीही तोडली नाही. दर आठवड्यात शुक्रवार ते रविवार म्हैसकर दाम्पत्य आवर्जून डोंबिवलीत निवासाकरिता येत असे. या तीन दिवसांत विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांना आर्थिक स्वरूपात अथवा अन्य मार्गाने आवश्यक ती सर्व मदत ते करीत होते. दत्तात्रेय म्हैसकर यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३८ रोजी डोंबिवलीत झाला. ते अखेरपर्यंत डोंबिवलीकर म्हणूनच जगले, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे त्यांच्याशी कौटुंबिक सलोख्याचे नाते होते. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. म्हैसकर यांच्यावर बुधवारी मध्यरात्री येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. म्हैसकर यांच्या निधनामुळे गुरुवारी जिमखान्याचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिमखान्याचे सचिव डॉ. प्रमोद बाहेकर यांनी दिली.

Advertisement
Advertisement