नागपूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे पदाधिकाऱ्यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२४ ) शहरातील सावेडी येथील माउली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटला. यासाठी कार्यकर्त्यांनी बुथवर असलेल्या पत्रकारांची यादी तयार करावी. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच असेही बावनकुळे म्हणाले.