आंदोलन अधिक तीव्र करणार
-सरकार केवळ मार्गदर्शन देऊ शकले नाही
-काळ्या टोप्या घालून शासनाचा निषेध
नागपूर: महावितरणमधील पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक, 412 शाखा अभियंते आणि लाईनमन अशा सुमारे साडे नऊ हजार पदांच्या नियुक्तीची पूर्ण प्रक्रिया पार पडली असून या उमेदवारांना फक्त नियुक्त्याच देणे शिल्लक आहे. शासन विद्युत सहायक आणि अन्य उमेदवारांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहात आहे काय, अशी संतप्त विचारणा माजी ऊर्जामंत्री आणि भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकार आणि ऊर्जामंत्र्यांना केली आहे.
नागपुरात आज संविधान चौकात शासनाच्या या नकारात्मक भूमिकेचा आणि दिरंगाईचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा भाजपाध्यक्ष अरविंद गजभिये, भाजयुमोच्या शिवानी दाणी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. साडे नऊ हजार उमेदवार महावितरणच्या नियुक्ती आदेशाची वाट पाहात आहेत. महावितरणने सुमारे 3 महिन्यांपूर्वी या प्रकरणी शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. पण शासनाने अजूनपर्यंत केवळ मार्गदर्शन दिले नाही. मार्गदर्शन देण्यासाठी ठाकरे सरकार एवढा वेळ लावीत आहे, तर नियुक्ती आदेश कधी देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज सकाळी 11 वाजता संविधान चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी डोक़्यात काळ्या टोप्या आणि गळ्यात काळे दुपट्टे घालून ठाकरे सरकारचा आणि ऊर्जामंत्र्यांचा निषेध केला. निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेले उमेदवार आत्महत्या करण्याच्या तयारीत असून त्यांची समजूत काढून त्यांना थांबविण्यात आले आहे. महावितरणमधील या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि ऊर्जामंत्री राऊत यांना यापूर्वी निवेदने देऊन नियुक्त्या करण्याची विनंती करण्यात आली होती. पण त्यांनी या विषयाकडे लक्ष दिले नाही. महावितरणने मात्र हा प्रश्न सोडविण्याऐवजी शासनाकडे टोलवला आणि उमेदवारांना लटकते ठेवले. शासनाने बेरोजगार उमेदवारांची क्रूर थट्टा चालविली आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी याप्रसंगी केला.