मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये ठार झाला. या एन्काउंटरप्रकरणी संशय व्यक्त करण्यात येत असून मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली.
न्यायालयाने हे एन्काउंटर असूच शकत नाही, अशा शब्दात पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. या सुनावणीत जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आदी पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस वाहनातून आरोपीला घेऊन जात असताना चार पोलीस अधिकाऱ्यांची गरज काय होती? यासाठी अतिरिक्त माणसांचा वापर झाला असं वाटत नाही का? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. इतकेच नाही तर त्याने हातातून पिस्तुल खेचून घेतली तेव्हा चार पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला रोखायला हवं होते. चार पोलिसांना तो आवरता आला नाही का? अशा प्रश्नांची सरबत्तीही न्यायालयाने केली.
गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितले होते.त्यामुळे त्या काढण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पुढची सुनावणी पुढच्या गुरुवारी होणार आहे.