महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर पदाधिकार्यांशी ई संवाद
नागपूर: कोरोनामुळे सर्वच उद्योग व्यवसायांवर व अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम पाहता जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक देशात आणणे, आपले तंत्रज्ञ़ान अधिक अद्ययावत करणे आणि सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढविणे हेच आपल्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या पदाधिकार्यांनी या दिशेने विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर पदाधिकार्यांशी व्हीडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून गडकरींनी आज त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आम्हाला कोरोनासारख्या आपत्तीचे रुपांतर इष्टापत्तीत करायचे आहे. त्यामुळे निराश होऊन चालणार नाही. कोरोना संकट व आर्थिक लढाई दोन्ही सोबतच लढायची आहे. जोपर्यंत कोरोनावर औषध निघत नाही, तोपर्यंत कोरोनाचा प्रसार होणार नाही, यापध्दतीने नियम पाळून कामाला लागावे लागणार आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- स्थलांतरित मजुरांवर आपले उद्योग अवलंबून असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे. वास्तविक ते खरे नाही.
स्थलांतरित मजूर हे 10 ते 20 टक्केच आहे. ते आपापल्या गावात गेले. ते पुन्हा येत असतील तर तेथील जिल्हाधिकार्यांचे पत्र घेऊन येथील जिल्हाधिकार्यांना दाखवावे लागेल. तसेच त्यांच्या आणण्याची व्यवस्था आणि राहाण्याची व्यवस्था उद्योजकांना करावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घेऊनच हे करावे लागणार आहे. उद्योजकांनी त्यांचे उद्योग हळूहळू सुरु करावे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उत्पन्न 2 वर्षात 1 लाख कोटींनी वाढविण्याचे आम्ही ठरवले असल्याचे सांगताना ते म्हणाले- पथकरातूनच आम्हाला यंदा 28 हजार कोटी मिळणार. पुढील वर्षी ते 40 हजार कोटी होणार. त्यामुळे 1 लाख कोटींचे उत्पन्न आम्ही गाठणार यात संशय नाही. आमचा प्रत्येक प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणार आहे. पीपीपी, बीओटी, डीओटीवर आम्ही कामे करतो.
आता तर परकीय बँकेचे एक मोठे कर्ज आम्हाला मंजूर झाले आहे. याशिवाय अनेक वित्तीय संस्थांशी आमची चर्चा सुरु आहे. पण बाजारात जोपर्यंत खेळता पैसा येणार नाही आणि सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढणार नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्था पूर्वीसारखी होणार नाही. व्यापाराच्या आणि उद्योगाच्या सर्वच क्षेत्रात खेळते भांडवल आले पाहिजे. यासाठीच परकीय गुंतवणूक आणणे, आपले तंत्रज्ञान अद्ययावत करणे या दृष्टीने प्राधान्याने विचार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.