नागपूर : समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस आपघातचे सत्र वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर अपघाताला आळा घालण्यासाठी खबरदारी म्हणून आता या महामार्गावर धावणाऱ्या प्रत्येक खासगी बसेस व त्यांच्या चालकांचे फिटनेस प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. सिव्हिल लाइन्समधील पोलिस भवन येथे बुधवारी वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस, आरटीओ, खासगी बसमालक व एसटीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यादरम्यान त्यांनी संदर्भात निर्देश दिले.
बसमधील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. खासगी बसचालकांनी या मार्गांवर धावणाऱ्या सर्वच बसचे क्रमांक, चालकाचा मोबाइल क्रमांक तसेच त्याच्याशी संबंधित संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणांना आधीच देणे गरजेचे आहे.
महामार्गाच्या सुरुवातीला तसेच निर्धारित स्थळावर चालकाने दारू प्यायली आहे किंवा नाही याची ब्रेथ अॅनालायझरने तपासणी करणे बंधनकारक ठरणार असून बसमध्येही हे यंत्र असणे गरजेचे आहे. तसेच ग्राहकांना कोणत्याही तक्रारीसाठी बसमध्ये मालकाचे नाव, त्याचा मोबाइल क्रमांक असलेले स्टीकर लावावे. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बसमालकांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती अमितेशकुमार यांनी प्रसार माध्यमांना दिली.