नागपूर/जबलपूर: पश्चिम नागपूरमधील भारतीय जनता पक्ष (भाजप) नेत्या सना खान यांचा मृतदेह सिहोरा गावाजवळ नर्मदा नदीत सापडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सना खानची हत्या तिचा पती अमित उर्फ पप्पू शाहू याने तिच्या डोक्यात बांबू घालून केली. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सना हीचा मृतदेह आरोपी शाहूने आपल्या साथीदारासोबत मिळून हिरेन नदीत फेकल्याची कबुली दिली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरेन नदी नर्मदा नदीला 3 किलोमीटर खाली मिळते, जिथून शाहूने सनाचा मृतदेह फेकून दिला होता. हा मृतदेह हिरेन नदीतून नर्मदा नदीत तरंगला असावा आणि नंतर नर्मदापुरम, हरदा मार्गे सिहोरा गावात पोहोचला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
जबलपूर येथील रहिवासी असलेला अमित शाहू या वाळू तस्कर आणि दारू माफियाने सना खान हिच्याशी एप्रिल महिन्यात लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाचा फोटो नागपूर टुडेच्या हाती लागला आहे.
विवाहित असलेल्या अमितची पत्नी मध्यप्रदेश पोलीस दलात नोकरीवर आहे. त्याच्या पत्नीला सनाशी असलेल्या पतीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाली. त्यामुळे दोघांत वाद झाले होते. पती-पत्नीने एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. २ ऑगस्टला अमितचा सना खानशी वाद झाला. त्या वादातून अमितने सना खानचा खून केला. तिचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून हिरन नदीत फेकून दिला.