मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहीसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ठाकरे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. महाराष्ट्राने ह्यापूर्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक आणि सुन्नं करणारं आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळलीये! हे भीषण आहे,असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले की, अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो, असे ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार करत अभिषेक यांची हत्या केली आहे. विशेष म्हणजे गोळीबार करणाऱ्या मॉरिस नोरोन्हानं नंतर स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली.