नागपूर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत किमान २६ जणांचा बळी घेतला. तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. हल्ल्याच्या वेळी नागपूरहून गेलेले काही पर्यटकही घटनास्थळी उपस्थित होते आणि ते थोडक्यात बचावले.
नागपूरचे एक पर्यटक, जे हल्ल्याच्या काही वेळ आधीच त्या ठिकाणाहून निघाले होते, त्यांनी एएनआयशी संवाद साधताना सांगितले, “आम्ही जसं तिथून बाहेर पडलो, तसंच गोळीबाराचा आवाज ऐकू आला. सगळे लोक घाबरून धावू लागले. आम्हीही मागे न पाहता पळायला सुरुवात केली.”
त्या पर्यटकाने सांगितले, “मी पत्नी आणि मुलांसोबत फिरायला आलो होतो. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तिथे सुमारे ४,००० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आमच्या अगदी २० फूट अंतरावर गोळ्या झाडल्या जात होत्या. पळताना माझी पत्नी खाली पडली आणि जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.”
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. त्यांनी म्हटलं, “हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासयात्रेला थांबवण्याचा हा प्रयत्न आहे, पण जम्मू-काश्मीर थांबणार नाही आणि भारतही थांबणार नाही. पंतप्रधानांनी याची दखल घेतली आहे, केंद्रीय गृहमंत्री घटनास्थळी पोहोचत आहेत आणि कठोर कारवाई होणार आहे. मृतांची यादी आम्हाला मिळाली असून त्यात दोन महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. जखमींमध्येही काही महाराष्ट्राचे आहेत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू,असे फडणवीस म्हणाले.