नागपूर: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविभवन येथे झालेल्या जनतादरबारात अंदाजे 2 हजार लोकांनी आपली गांऱ्हाणी व तक्रारी ऐकवल्या. सर्वाधिक तक्रारी वीज, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व पोलिस विभागाच्या होत्या.
या जनता दरबारात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली हजेरी लावली. अनेक वयोवृध्द नागरिक, महिला व तरुणांनी आपल्या तक्रारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्या. प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे एैकून घेतले. त्यांच्या मदतीला विशेष कार्यअधिकारी मनोहर पोटे व विशेष अधिकारी संजय धोटे हे होते. प्रशासनातर्फे
उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके व पोलिस अधिकारी प्रामुख्याने उपस्थितीत होते.
म्हाडा संदर्भात मोठया प्रमाणात तक्रारी असल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी वेगळी बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जनता दरबारामुळे अनेकांची प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जनता दरबार वारंवार घेण्यात येत असल्यामुळे प्रलंबित प्रकरणांचाही आढावा घेण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.